ओळख स्पर्शाची
अमेय व अन्वी च्या शाळेला नुकत्याच दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. आकाशकंदील तयार करूनझाला होता. नवीन कपडे, फराळ आणि मित्रमैत्रिणींसोबत धम्माल अशी दोघांचीही दिवाळीची मज्जा सुरू झालीहोती. दिवाळीच्या पहाटे राधिकेने दोन्ही मुलांना छान रांगोळी काढून पाटावर बसविले. औक्षण करून अंगभर तेलचोळले. छान मालीश करून तेल जिरवले. आईच्या ह्या हव्याहव्याशा मायाळू स्पर्शाने मुलेही सुखावली. मनोमन मात्र राधिका वर्तमानपत्रातल्या एका बातमीने अस्वस्थ होती. आज दुपारी जेवण झाले की, मुलांशी बोलायचे, चार गोष्टी समजावून सांगायच्या, असे तिने मनोमन ठरवून टाकले.
दुपारी आवराआवर झाल्यावर राधिकेने मुलांना जबळ बोलावले आणि विचारले, “अमेय, अन्वी आज मी तुमच्या अंगाला तेल लावून दिले, कसे वाटले रे?” दोघेही मुले एकासुरात ओरडली, “मस्स्स्त!” राधिका पुढे विचारू लागली, “बरं बरं! आणि झेंडूच्या ज्या माळा आपण मघाशी केल्यात, त्या फुलांचा स्पर्श कसा होता?” मुलं म्हणाली, “तो पण छान होता, आई.” राधिकेने पुढे विचारले, “आता मला सांगा, तापलेल्या जमिनीचा स्पर्श, तापलेल्या वाळूचा स्पर्श कसा असतो रे?” “अगं, भाजेल ना पाय आमचा! आम्हाला नाही आवडत तापलेली वाळू!” मुलं जोरात ओरडली. “म्हणजे ज्या स्पर्शाने आपल्याला लागते, दुखते, आपल्याला नकोसे वाटते, रडू येत ते सगळे स्पर्श वाईट असतात, हो की नाही?” राधिका पुढे सांगू लागली, “कुणीतरी जोरात बुक्की मारली, पाठीत धपाटा मारला, हात पिरगाळला, नखं बोचविली की कसं दुखतं नं ? हे सगळे स्पर्श वाईट किंवा नकोसे स्पर्श आहेत.” राधिका मुलांना समजावून सांगू लागली. “काहीवेळेस मित्रां-मधील लुटूपुटीच्या मारामारीत आपल्याल लागते पण आपल्याला त्याचा खूप राग येत नाही, आपण थोड्यावेळाने ती भांडणं विसरूनही जातो हो की नाही? पण काहीवेळेस काही माणसं लहान मुलांना असे स्पर्श करतात, हात लावतात, त्रास देतात की ज्यामुळे तुम्हाला खूप घाण वाटू शकते, त्रास होऊ शकतो, दुखू शकते.”
अमेय व अन्वी कान देऊन ऐकत होती. राधिका पुढे म्हणाली, “मला सांगा बरं, आपण कपडे का बरे घालतो?” मुलं लगेच उत्तरली. “ऊन लागू नये म्हणून! थंडी-वारा यापासून संरक्षण व्हावे म्हणून! अगं परवाच तर शिकलो ना आमच्या विज्ञानाच्या तासात!” “अगदी बरोबर”, राधिकेने पुढे समजावले, “कपडे घालताना आपण आपले नाजूक अवयव म्हणजे आपली शी, शू ची जागा, आपली छाती म्हणजे थोडक्यात आपल्या खांद्यापासून ते मांड्यांपर्यंतचा भाग झाकून ठेवतो की नाही?” मुलं एव्हाना एकमेकांकडे बघून हसू लागली होती. राधिकेने ते समजून घेतले आणि पुढे म्हणाली, “आपल्या या खास अवयवांची आपल्याला काळजी घ्यायची असते. पण कधीकधी काही माणसं छोट्या मुलांना या जागी, असे स्पर्श करतात, हात लावून त्रास देतात की, त्यामुळे दुखते. कधीकधी रक्त पण येऊ शकते.” मुलं आता गंभीर होऊन शांतपणे ऐकू लागली.
राधिका पुढे म्हणाली, “अशी माणसं मुलांना उगीचच जवळ घेतात, कुरवबाळतात, चिमटे काढतात हे सगळं तुम्ही दुसऱ्या कुणाला सांगू नये म्हणून तुम्हाला खाऊ देतात, चॉकलेट, खेळ देतात किंवा कधीकधी रागावून, डोळे मोठे करून भीती घालतात आणि मग काही छोटी मुलं फसतात, घाबरतात आणि अशा त्रास देणाऱ्या मोठ्या माणसांना त्यांच्या खास अवयवांना हात लावू देतात. कधी मूल एकटे असल्याचा फायदा घेऊन अशी वाईट माणसं लहान मुलांना त्यांचे खास अवयव दाखवायला सांगतात, आणि त्रास देतात.”
थोड्याशा बावरलेल्या मुलांना राधिकेने जवळ घेतले. अन्बीच्या केसांच्या बटा नीट सावरत राधिका म्हणाली, “लक्षात ठेवा हं बाळांनो, आईशिवाय कुणालाही तुम्ही आपल्या खास अवयवांना हात लावू द्यायचा नाही. असे कुणी वागत असेल तर ते चुकीचे आहे. ज्या स्पर्शाने आपल्याला घाण वाटते हे ओळखून “मला हे आवडत ही, माझ्याशी असे वागायचे नाही.” असे मोठ्याने ओरडायचे. कुणाही अनोळखी व्यक्तीसोबत आडोशाला एकटे जायचे नाही. ओरडावे लागले तर जोरात ओरडायचे. घरात आईला, आजीला, आणि शाळेत तुमच्या बाईना लगेच सांगायचे. जो माणूस तुम्हाला त्रास देत असेल त्याचे नाव घेऊन न घाबरता सांगायचे. तुम्हाला त्रास देणारा माणूस वाईट असतो. मुलगा किंवा मुलगी या दोघांबाबतही असे घडू शकते. त्यामुळे काळजी घ्यायची हं दोघांनी पण!”
मुलं एव्हाना आईला बिलगली. राधिकेच्या मनातली घालमेल शमली. तिला मुलांना मनाने सक्षम, सजग केल्याची जाणीव झाली. ओळख स्पर्शाची प्रशिक्षण या ‘ ज्ञान प्रबोधिनी, संवादिनी ‘ आयोजित कार्यशाळेचे तिने मनोमन आभार मानले. ती मुलांना योग्य ते ज्ञान देऊ शकली. शाळा सुरू झाल्यावर मुलांच्या शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेशी बोलून इतर सर्व मुलांना पण या प्रकारचे शिक्षण मिळावे असे तिला उत्स्फूर्तपणे वाटले, किंबहुना तिने तसा निश्चयच केला. एका अनामिक समाधानाने तिचा चेहरा उजळून निघाला. मन भरून पावले, आणि तृप्त मनाने ती दिवाळीच्या संध्याकाळची तयारी करण्यास उठली.
(लेखिका – स्वाती बापट बालविकास प्रचोदक व समुपदेशिका आहे.)