Blogs

मुलांच्या विकासातील पालकांची भूमिका

January 28, 2021

मुलं जशी शरीराने वाढतात तशी मनानेही मजबूत, परिपक्व  होत असतात. या वाढ विकासाच्या टप्प्यांवरआईवडिलांची समर्थ आश्वासक साथ आणि आधार मिळाला तर आजूबाजुच्या बऱ्या – वाईट परिस्थितीला, मानसिक धक्क्यांना मूल सहज पार करू शकते. मुलाचं व्यक्तिमत्त्व घडताना, एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करायची वेळ आल्यास, भावनिकरित्या मूल सक्षम हवे अन्यथा एखादी वर्तन समस्या मुलामध्ये दिसू. लागते. त्याचं वागणं बदलतं. अशावेळी सुजाण पालक त्याकडे दुर्लक्ष न करता, त्या वर्तनामागची कारणं शोधून काढतात. समस्येचे मूळ कशात आहे याचा विचार करतात. त्यावर कशा पध्दतीने तोडगा काढता येईल याचा विचार करतात.

वर्तनसमस्येची उकल होण्यासाठी पालक तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. बाह्य लक्षणं नोंदवली गेलेली असली तर वर्तन समस्या अगदी सहज लक्षात येते, त्यावर योग्यवेळी उपाय केले गेले तर मुलांच्या व्यक्तिमत्त्वात बाधा येत नाही.

वर्तनसमस्या मुलांच्या वागण्यातील बदलांबरून, बाह्या लक्षणांवरून लक्षात घेता येते.साधारण चार पाच वर्षांपासून ते सतरा अठरा वर्षांपर्यंत मूल ठरावीक पध्दतीने वागते. वयानुसारत्यांच्या भावनिक गरजा बदलतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर वर्तन समस्या दिसू लागते. काही ठळकपणे आढळणाऱ्या वर्तनसमस्यांची यादी पुढीलप्रमाणे :-

१) अती घाबरटपणा, बुजरेपणा

२) आक्रस्ताळेपणा, मारकुटेपणा

३) बोलण्यातला तोतरेपणा, अति गप्प अथवा अति बडबड

४) तापटपणा, उर्मटपणा, अश्लील वर्तन

५) बिछाना ओला होणे अथवा चड्डीत शू / शी करणे.

६) अति चंचलपणा

७) एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू न शकणे.

८) वारंवार खोटं बोलणे.

९) अति भावनिक उद्रेक, रडवेपणा

१०) चोरी करणे.

मुलांना मायेची, आपुलकीची गरज असते. कधीकधी पालकांच्या अति दडपणामुळे,धाकामुळे, रागावण्यामुळे मुलं लहानपणापासूनच तोतरं बोलतात. मोकळा खुला संवाद साधू शकत नाहीत. घाबरटपणा वाढत जातो. पालकांकडून ‘नीट बोल’ असा दम वाढत गेल्यामुळे मुलं अजूनच बावचळतात आणि तोतरेपणा वाढतो. अशावेळी आधाराची, न रागवण्याची नितांत गरज असते. असुरक्षिततेची भावना दूर झाली की, तोतरेपण हळूहळू कमी होत जाते आणि मूल पूर्ववत आनंदी, समाधानी, हसरं दिसतं – मनाने स्वस्थ होतं.

वर्तनसमस्येविषयी पालकांनी जागरूक राहून योग्यवेळी उपाय करणे निकडीचे आहे. मुलांच्या व्यक्तिमत्त्व संवर्धनात ते अतिशय महत्त्वाचे आहे.
लहानपणीच्या लहान सहान कुरबुरींकडे डोळेझाक केल्यास मुलांमध्ये मोठ्या मानसिक समस्या निर्माण होण्याचा धोका नाकारता येण्यासारखा नाही. ‘व्यसनाधीनता’ हे तर उत्तम उदाहरणआहे. सुरुवातीस मित्रांचा आग्रह म्हणून, कुतूहल म्हणून, पुढे गटात सहजच म्हणून घेतलेली दारू,सिगरेट, गुटखा, चरस, गांजा इ. पुढे सवयीचा भाग बनताना दिसतात. पौगंडावस्थेत संभ्रम नंतर मुलांची व्यथा, समस्या बनतात. मुलांपर्यंत प्रेम, आधार, सुरक्षितता, वात्सल्य योग्य वयात, योग्य प्रमाणात पोहचण्यासाठी घरातील वातावरण आनंदी, उत्साही, सकारात्मक हवं. याची जाणीव पालकांनी ठेवायला हवी.

(लेखिका – स्वाती बापट बालविकास प्रचोदक व समुपदेशिका आहे.)