पालकांची आनंदी मनोभूमिका
स्वाती बापट
उन्हाळा चांगलाच जाणवू लागला म्हणून मुलांना घेऊन मी पोहायची चौकशी करायला नुकतीच गेले होते. पोहायचा टँक चांगला मोठा आणि स्वच्छ वाटला.त्यातील निळे निळे पाणी,त्यात मनसोक्त डुंबणारी, मजा करणारी, आनंद घेणारी चिल्ठी-पिल्ली मुले बघून तर अजूनच मजा वाटली. तिथल्या बॅचचे सर मुलांना उत्तम शिकवत होते. आधी पाण्याची भीती कमी व्हावी म्हणून घाबरणाऱ्या मुलांना पाण्याशी खेळू देणे,नंतर पाण्याला सरावलेल्या मुलांना पाण्यात पाय कसे मारायचे, ते शिकवणे; त्यापेक्षा अधिक सिनियर मुलांना वेगवेगळे स्ट्रोक्स प्रॅक्टीस असे त्यांचे छान चालू होते. पुढे जरा डीपमध्ये जाऊन डाईव्ह मारायला शिकणारी, वेळेचा सराव करणारी, स्पर्धांमध्ये उतरणारी मुले… अशी वेगवेगळ्या स्तरातील मुले बघून माझी पोहायची उत्सुकता अधिकच वाढली.
इतक्यात दाताखाली खडा यावा अन् रसभंग व्हावा तसे झाले.एक आई आपल्या तीन-साडेतीन वर्षाच्या मुलीला स्वत: खुर्चीत बसून ‘पोहणं’ शिकवत होती. “हात पुढे घे… ओढ पाणी मागे… असे नाही… जोरात ओढ… ” असे तिचे चालू होते. मुलगी केविलवाणी दिसत होती. आता आईच कोच झालेली बघून खरा कोच तरी काय बोलणार? साहजिकच त्यांनी आपला मोर्चा इतरत्र वळवला होता.इकडे आईच्या अपेक्षांचे ओझे वाढतच होते. ‘अगं तो बाजूचा मुलगा बघ,किती छान पोहतोय… तसे हात मार… मूर्ख कुठली…’ आईचे शाब्दिक फटकारे वाढल्यामुळे मुलगी पाण्यात काबरीबाबरी होऊन गेली. मुलीमध्ये पोहणे कोंबायची आईची घाई बघून मला आईची कीव आणि मुलीची दया आली.
प्रत्येक मूल वेगळे आहे. त्याची कुठलीही गोष्ट शिकण्याची, आत्मसात करण्याची,त्यात तरबेज होण्याची गती वेगळी आहे.त्याची आवड, कुवत, गरज वेगळी आहे.पालक म्हणून आपण त्याला फक्त मुभा, संधी द्यायची. जमले तर शाब्दिक वा अशाब्दिक कौतुक वेळोवेळी नक्की करायचे; पण ज्ञान त्याच्या गळी उतरवण्याची घाई मात्र करयची नाही.
खूप वर्षांपूवी कधीतरी एकदा असेच मुलांना प्राणीसंग्रहालयात प्राणी दाखवायला घेऊन गेले होते.तिथल्या छोट्याशा पाणवठ्यावर आरामात पहुडलेल्या हिप्पोपोटेमसला बघून मुले अचंबित झाली होती. आपल्या घरी असलेल्या प्राण्यांच्या चित्रातला प्राणी तो हाच म्हणून खूप वेळ त्याचा आकार, त्याचे पाण्यात डुंबणे ती न्याहाळत होती. मी शांतपणे सगळे बघत होते. हळूहळू मुले बोलू लागली.तो कुठे राहतो? काय खातो? त्याच्या बाळाला काय म्हणतात? मग मीही ते सांगून त्यांचे समाधान करू लागले. तात्पर्य, मुलांच्या मनात आधी
प्रश्न तयार होऊ दिल्यानंतर मग त्याची समर्पक शब्दात उत्तरे दिलेली मुलांना आवडतात. अशी माहिती ते सहजच लक्षात ठेवतात. मुख्य म्हणजे मिळालेल्या त्या ज्ञानाने आनंदतात. शिक्षणाचा मूळ गाभा आनंद हा आहे.ज्ञान कोंबण्याच्या, माहिती पुरवण्याच्या पालकांच्या अतिरेकी उत्साहापायी तो हरवता कामा नये. हसत-खेळत, अनुभव घेत झालेले शिक्षण मुलांच्या नेहमीसाठी लक्षात राहते. शिवाय या सगळ्या प्रक्रियेत पालक-पूल नात्याची वीण आणखी घट्ट होत राहते ही आणखी एक जमेची बाजू.
मुलांच्या विकासाच्या टप्प्यावर पालक सक्रीय मदतीचा हात देऊ शकतात. मात्र मदत करतांना कुठेतरी अति उत्साहाच्या भरात मुलांच्या शिकण्याच्या या सहज प्रवृततीलाच ‘खीळ’ तर बसत नाही ना ? हे पाहणे गरजेचे असते. सुजाण पालकांना हे भान नक्कीच असते.
भावनिक पातळीवर आपले मूल सक्षम, शारीरिक पातळीवर सुदृढ, तसेच सामाजिक व नैतिक अगाने संपन्न व्हावे असे पालकांना स्वाभाविकपणे वाटत असते. मुलांना वळण लागावे, शिस्त लागावी म्हणून ते प्रयत्नशील असतात. त्यासंदर्भात ते एक जबाबदार भूमिका निभावत असतात. मात्र हे करीत असताना आई-वडिलांमध्ये एकवाक्यता हबी. ती जितकी जास्त तितका मुलांच्या विकासाला हातभार अधिक.
याशिवाय पालकांच्या चांगल्या-वाईटाबद्दलच्या कल्पनाही स्पष्ट असतील तर मूल त्या सहजगत्या
आत्मसात करते. अन्यथा त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता अधिक. मुख्य म्हणजे कोणतेही शिक्षण मुलांशी संबाद साधत, हसत-खेळत दिले गेले तर ते त्यांच्यात खऱ्या अर्थी रुजेलही आणि नात्याप्रधील दुबाही ठरेल. तसेच त्यांचा सर्जनशीलतेकडील प्रवास सहजगत्या होईल. खरंना?