Blogs

मुलांच्या वर्तन समस्या

January 28, 2021

एकदा एक लहान मूल आईला विचारते, 

‘“आई, मी छोटा असताना कुठे होतो गं?’* आई हसून मुलाच्या गालावरून हाथ

फिरवत म्हणते, “बाळा तू नं माझ्या पोटात होतास.” मूल चौकसपणे परत विचारते, “त्याआधी ?” ‘“त्याआधी तू नं माझ्या स्वप्नांत होतास!” अन्‌ मूल आईच्या गच्च मिठीत सामावते.

मुलाबद्दलच्या पूरक वातावरणाची खरी सुरुवात अशी आईच्या आनंदी मनोभूमिकेतून होते. स्वतःची काळजी घेणं, आरोग्य-आहार विहार सांभाळणं ही ती नित्यनियमानं करते.  गर्भातलं उबदार वातावरण मुलाला आवडू लागतं. अगदी ताणविरहीत अन्‌ आनंदी. पुढे मुलाच्या जन्मानंतर आई-वडिलांची खरी कसरत सुरू होते. नोकरी, घर, मुलासाठी दाया, पाळणाघर, नर्सरीच्या अडमिशन, शाळेसाठीचे अर्ज अशा अनेक पातळ्यांवर मुलासाठी, त्याच्या विकासासाठी पालक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा, मूल भावनिकरीत्या सक्षम असावे, शारीरिक पातळ्यांवर सदृढ व निरोगी राहावे, सामाजिक, नैतिक अंगाने पण मूल संपन्न असावे, म्हणून आई-बाबा किंबहुना कुटुंबच एक जबाबदारीची भूमिका निभवतात. शाळा निवडताना पालक शिक्षणाचा दर्जा व स्तर बघतात. काही ठिकाणी शिक्षण, शिस्त, माध्यम-बोर्ड असेही निकष लावलेले दिसतात. तत्त्वनिष्ठ, सामाजिक बांधीलकी व मूल्यांवर अधिष्ठित शाळांकडे तर कधी इंग्रजी माध्यमांच्याच शाळा निवडण्याकडे अलीकडच्या काळात पालकांचा ओढा आहे. माध्यम कुठलेही असले तरी, आपल्या मुलाची कुवत व गरज ओळखून शाळाच नव्हे तर बोर्डही निवडले जावे. प्रत्येक शाळांची आपली अशी तत्त्व, मूल्य, संस्कार असतात. ते चांगले किंवा वाईट असे ठरविण्यापेक्षा आपल्या पठडीत ती शाळा बसते का, आपल्याला ती शाळा रुचते का, हे बघणे इथे खूप महत्त्वपूर्ण ठरेल. शालेय जीवनात मुलांची वाढ व विकास झपाट्याने होत असतो.

आपले मूल शाळेमध्ये रमेतय ना, त्याला शाळा आवडतेय ना, त्याचे उत्तम समायोजन त्याला करता येतेय ना… आदी गोष्टींमध्ये पालक महत्त्वपूर्ण भूमिका निभवतात. शालेय वर्षात मुलांचा भाषिक विकासाचा वेग खूप असतो. घरात, परिसरात, शाळेत, समाजात बोलण्यात येणारे, ऐकलेले शब्द मूल चटकन आत्मसात करते. हे प्रयोगशील मूल ते उच्चारून त्याचा वापरही करून बघते, त्यामुळे त्याच्या अवतीभोवतीचे वातावरण सुयोग्य असेल याची काळजी पालक घेऊ शकतात. वेगवेगळ्या भाषा शिकायचं हेच वय असतं. खूप शब्द, त्यांच्या छाटा, त्यांचे उब्चार, शब्दांमधील हेतू मुलांना या वयात कळू शकतो. सुजाण पालकांनी त्यांच्यासाठी शब्दभंडारच खुलं करावं. लहाणपणी बडबडगीते, गाणी उत्तमोत्तम गोष्टींच्या माध्यमातून अनेक शब्द मुलांपर्यंत पोहोचतात. श्लोकांच्या माध्यमातून वाणी- स्वर-उच्चार-स्मरण इत्यादी सर्व घटकांवर मूल शिकू शकते. लहान मुलांच्या खेळाबाबतही हेच म्हणता येईल. हवे तसे, हवे तेवढे, हवे त्यांच्याशी मनसोक्त खेळू द्यावे. फक्त त्यांना इजा होणार नाही, याकडे लक्ष असू द्यावे. मूल घरातील  डाव, चमचा, वाटी, पेला इत्यादींशी तासन्‌ तास खेळू शकते. ठोकळ्यांचा खेळ तर लहान मुलांना खूपच आवडतो. पाणी, माती वाईट न मानता, मुलांना मनमुराद त्यांच्याशी खेळण्यांचा आनंद घेऊ दिला पाहिजे. लहान, मोठे मणी ओवायचा जाडसर दोरा हाताशी असला की मूल एकाग्र चित्ताने दोऱ्यात मणी ओवते. जाडसर क्रेऑन आणि कागद देऊन मुलांना उभ्या आडत्या तिरप्या हव्या तशा रेषा नक्कीच काढू द्याव्यात. ही कृतिशीलता पालकांनी जपली पाहिजे. छोट्या छोट्या हातांनी बागेत जाऊन फुले वेचणे, निसर्गातले ऊन, पाऊस, वारा अंगावर घेणे, वाळूत खेळणे असे मुलांबाबत सहजगत्या केले जावे. घरातही उड्या मारणे, लोळणे, घोडा घोडा करणे, हात-पाय पसरून शरीराला ताण देणे, टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करणे ही सगळी शारीरिक कौशल्ये मुलाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. अधूनमधून मुलांना वेगवेगळे अवयव व ज्ञानेंद्रियांचा वापर करणारे खेळ द्यावेत. स्पर्शज्ञान वाढवणारे खेळ खेळू द्यावेत. शिकण्याच्या या टप्प्यात मूल अनुकरणानेही शिकते, हे सुज्ञ पालकांच्या लक्षात असते. आई-बाबा त्यासाठी घरात एक अनुकूल वातावरण निर्माण करू शकतात. खेळता खेळता मूल पडलं तर पालकांनी मुलांचा उत्साह जरूर वाढवावा, जिंकण्यासाठी खेळणं नसून आनंदासाठी खेळणं आहे, हे जरूर सांगावं.

या वयात मुलाने उत्तम आहार घ्यावा. वाढीच्या या टप्प्यात शारीरिक वाढ बहुतांशी आहार व व्यायामावर अवलंबून असते. बर्‍याचदा उत्तम आहारामुळे रोगजंतूंपासून बचाव होतो व मूल आजारी कमी वेळा पडते. वाढीच्या या वयात मुलाने उत्तम आहार घ्यावा. वाढीच्या या टप्प्यात शारीरिक वाढ बहुतांशी आहार व व्यायामावर अवलंबून असते. बर्‍याचदा उत्तम आहारामुळे रोगजंतूंपासून बचाव होतो व मूल आजारी कमी वेळा पडते. वाढीच्या टप्प्यातला वेग कायम राहतो. अवचित लहान आजारपणानंतरही शरीर वेगाने, जोम पकडून कामास लागते व शरीराची वैकासिक गाडी पूर्वपदावर आणण्यास मदत करते.

मुलाचा भावनिक विकास त्याच्या भाषेतून व्यक्त होतो. मला राग आलाय असे सांगून किंवा मूल वर्तनाद्वारे नाराजी व्यक्त करते. जमिनीवर  लोळण घेऊन हट्ट व्यक्त करू शकते, यासाठी समाजमान्य पद्धतीने भावना व्यक्त करायला पालकांनी मुलांना शिकवायला हवे. मनावरचा ताबा कळण्याइतपत नव्हे पण योग्य शब्दांत समजावून सांगण्याइतके मूल नक्कीच मोठे झाले आहे. मुलाला समजून घेणं, त्याचा लाड करणं, त्याला कौतुक देणं, त्याच्या लहानसहान कामांमध्ये सहभाग घेणं, पालकांनी आवर्जून करावं. मूल कुठल्या बाबतीत आपल्याला अवलंबून आहे अथवा नाही हे वयानुरूप बदलतं व हे पालकांस ठाऊक असावं. मुलामधील वर्तन समस्या, जसे समाजात न मिसळणे, अतिचंचलपणा, अतिदुःख, घाबरलेलं व्यक्तिमत्व, रोजच्या रुटीनमध्ये नाराजी व्यक्त करणं, डोळ्यांस डोळा न देता बोलणं, खोटं बोलणं इत्यादींच्या वारवारितेकडे पालकांचे जरूर लक्ष असावे. त्या वर्तनसमस्या नोंदविल्या जाव्यात.

मुलांना वळण व शिस्त लावण्याबाबत आई-बाबांमध्ये एकवाक्यता हवी. काय चूक आणि काय बरोबर, याच्या कल्पना अगदी स्पष्ट असाव्यात. चांगलं काय, वाईट काय, याबाबत मुलादेखत वाद होऊ देऊ नये. मुलांमध्ये सामाजिक मूल्य रुजवायची सुरुवात ही पालकांपासून होणेच गरजेचे आहे. अनाथाश्रम, वस्ती पातळीवरील एखादी काम करणारी संस्था इत्यादींना अवश्य मुलासकट भेट दिली जावी. योग्य शब्दांत, मुलांशी संवाद साधणाऱ्या शैलीत मुलांशी वेगवेगळ्या विषयांवर, अनुभवांवर, माहितीपर बोलले जावे. शैक्षणिक आलेखापेक्षा एक समृद्ध शैक्षणिक अनुभव देण्यासाठी ज्ञान व शिक्षण आहे, हे मुलांपर्यंत जरूर पोहोचवले जावे. पालकांच्या अपेक्षा व पध्दत थोडीशी बदलली की, मूल खूप सुखावतं. शिकणं म्हणजे मग सृजनशीलतेकडचा प्रवास होऊ शकतो. तो नात्यांमधला पण दुवा ठरतो. मुलांसाठी जिथे कमी तिथे मी, ही पध्दत, हा मार्ग अवलंबला की मूलाचा खऱ्याअर्थी विकास होऊ शकतो.

शुभास्ते पन्थानाः सन्तु!

(लेखिका – स्वाती बापट बालविकास प्रचोदक व समुपदेशिका आहे.)